भाजपातून एकही आमदार फुटणार नाही : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इतर पक्षांतून आमच्याकडे आलेले नेते अतिशय प्रगल्भ आहेत. देशाला राहुल गांधी नाही तर नरेंद्र मोदीच सक्षम नेतृत्व देऊ शकतात याची त्यांना खात्री आहे. राज्याच्या राजकारणाची दिशा त्यांना कळते. इतकेच नाही तर सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजप आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन,  माजी मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणले, बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतल्याने नव्या-जुन्यांचा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळे एकदिलाने काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आगामी काळात तेथे भाजपचाच खासदार असेल, असेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाळासाहेब सानप हे  काही गैरसमजांमुळे पक्षाबाहेर पडले होते. आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत. सानप यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल. आता नाशिकमधील कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करावे. सानप यांनी पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू, सगळे एकोप्याने काम करतील, अशी ग्वाही दिली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मनोगत  केले.