…तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्रिमंडळात गुणवान सदस्यांना घेऊ इच्छित आहेत. अरुण जेटली हे त्यांच्या खूप जवळचे मित्र होते. अरुण जेटली आणि इतर काही ज्येष्ठ नेत्यांचं निधन झाल्यानंतर मोदींनी एस शिवशंकर, हरदीपसिंग पुरी यांना मंत्रिमंडळात घेतलं. निर्मला सीतारामण यांना अर्थमंत्रिपदी बढती दिली. परंतु अजूनही त्यांना थोडी पोकळी जाणवत आहे.

काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी 10 प्रमुख खात्याच्या मंत्र्यांना आपापल्या खात्याच्या कामगिरीविषयी सादरीकरण करायला सांगितलं. अर्थ, रेल्वे, पायाभूत विकास आदी खाती त्यात होती. त्यांच्यातल्या काहींवर विशेषत: सुधारणांच्या धिम्या गतीबद्दल मोदी नाराज असल्याचं समजत आहे. काही मंत्र्यांविषयी प्रतिकूल अहवालही आले आहेत. अर्थमंत्री लोकांशीच काय तर पक्षकार्यकर्त्यांशीही जुळवून घेऊ शकलेल्या नाहीत याची मोदींना काळजी आहे. अर्थमंत्री अर्थ विषयक जाणकार तर असतोच याशिवाय विविध पातळ्यांवर लोकांशी नाळ जोडलेला राजकारणीही असावा लागतो. सरकारची धोरणं, कार्यक्रम लोकांपर्यंत नेण्यात अर्थ मंत्रालय कमी पडलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे पूर्ण प्रभारी केलं गेलं. यावरून मोदींच्या मनात काहीतरी शिजत आहे हे नक्की आहे. कोणी याची कल्पनाही केली नव्हती. भाजपांतर्गत मांडणीत काहींच्या ज्येष्ठतेला त्यामुळं धक्का बसला आहे. आधीचं नेतृत्व नितीश कुमार यांच्यापुढं नमतं घेत होतं. मात्र फडणवीस मात्र त्यांना पुरून उरतील असे पक्के आहेत. हा जुगार जर यशस्वी झाला तर केंद्रात फडणवीसांचं महत्त्व वाढेल. पुढं त्यांना केंद्रात आणण्याचा आणि मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा होईल. संवादातील दरी भरून काढण्यास मदत करणारा त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असं मंत्रालय फडणवीसांना मिळू शकेल.