देवेंद्र फडणवीसांना ‘या’ कारणासाठी नागपूर पोलिसांकडून ‘समन्स’

नागपूर : पोलीसनामा आँँनलाईन – मुंबईत गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होत असतानाच तिकडे नागपूरमध्ये नागपूर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर राहण्यासंबंधीचे समन्स बजावले.

हे प्रकरण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे आहे. अ‍ॅड. सतीश हुकेंनी देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शपथपत्र सादर करताना दोन गुन्ह्यांची माहिती दिली नाही, असा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयात न्याय न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण नेले. तेथेही त्यांचे म्हणणे मान्य न झाल्याने त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फिर्यादीचे म्हणणे ऐकून खटला चालवावा, असा निर्णय देऊन हे प्रकरण पुन्हा प्रथम वर्ग न्यायालयाकडे पाठविले. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाचे हे समन्स नागपूर पोलिसांनी काल बजावले.

उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी शपथविधी असताना त्याच दिवशी पोलिसांनी बजावलेल्या या समन्सचा टाईमिंग पाहून त्याची चर्चा सुरु झाली.