‘महाराष्ट्राला मूर्ख बनविण्याचा नवा व्यवसाय सुरु’, फडणवीसांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. याच निवणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार जिल्ह्यात जाहीर सभेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढविला. ‘हे सरकार विश्वासघाताने तयार झालेले आहे. या सरकारने पहिला विश्वासघात अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्‍यांचा केला, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. दुसरा विश्वासघात म्हणजे त्यांना कर्जमाफीतून वगळून, आता 10 रूपयांत भोजन देण्याचे सांगून त्यावरही अटी लादल्या. महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा हा नवा उद्योग आहे’, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले कि, सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले आहे. आता 10 रूपयांत किती लोकांना भोजन याचे जिल्ह्यानुसार आकडे दिले जात आहेत. संपूर्ण नंदूरबार जिल्ह्यातील केवळ 300 लोकांना हे जेवण मिळू शकेल, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनन्वित अत्याचार सहन केले. दोनवेळा जन्मठेप भोगली. अशा स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान सुरु आहे. त्यांचा अपमान शिवसेना कितीवेळा सहन करणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी अपमानास्पद विधान केल्यानंतर शिवसेना मूग गिळल्यासारखी गप्प होती. त्यात काल काँग्रेस पक्षाने एक पुस्तक वितरित केले. त्या पुस्तकात सावरकरांबद्दल अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण केले असून ते समलैंगिक होते, असे हे विकृत लिखाण करण्यात आले आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. जनताच तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसला दिला.

धुळे जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी रवाना होण्यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे प्रचारासाठी दोन सभांना फडणवीस यांनी संबोधित केले. गेल्या 5 वर्षांच्या काळात गरिब आणि आदिवासींसाठी सरकारच्या वतीने केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/