‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ : धनंजय मुंडेंचा रावसाहेब दानवेंवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येडं पेरलं आणि खुळं उगवलं असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघात केला आहे. जालन्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा उल्लेख करताना हेलिकॉप्टरचा पायलट असा उल्लेख केला होता. तेव्हा त्यांच्यावर टीकाही झाली होती. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष.” असे मुंड म्हणाले. इतकेच नाही तर, बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत टीका करत येडं पेरलं आणि खुळं उगवलं असा घणाघातही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ?
जालन्यात अभिनंदनच्या सुटकेविषयी मोदींचे कौतुक करतना रावसाहेब दानवे म्हणाले की, “तुम्ही चॅनेलवर पाहिलं असेल 24 तासाच्या आत पाकिस्तानी सैन्याने अभिनंदनला आपल्या देशात आणून सोडला. अरे एक पोलीसवाला आमची मोटारसायकल पकडतो, ट्रिपल सीट धरलं तर चार दिवस कोर्टातून सोडून आणावी लागते. आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट 24 तासांत सोडून आणला असा पंतप्रधान या देशाला पाहिजे.” असे म्हणत दानवे यांनी अभिनंदन यांचा उल्लेख हेलिकॉप्टरचा पायलट असा केला होता.