‘माझे पप्पा’ निबंधाद्वारे कुटुंबाचे दुःख व्यक्त करणाऱ्याला पालकमंत्री मुंडेंचा मदतीचा हात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकदा शाळेमध्ये मुलांना निबंध लिहिण्यास सांगितले जाते. अशाच एका निबंध लिहीणाऱ्या इयत्ता चवथीतील विद्यार्थ्याने केलेलं लिखाण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. वाचणाऱ्या प्रत्येकाला रडायला येईल अशा प्रकारचा हा निबंध आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः या निबंधांबाबतची दखल घेतली आहे.

माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो….. अशा प्रकारचा निबंध इयत्ता चवथीमध्ये शिकणाऱ्या मंगेशने लिहिला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या निबंधाची दखल घेत मंगेशच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

मुंडे यांनी संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागाकडून दीड लाखांचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. तसेच, दिव्यांग कल्याण निधीतून इतरही मदत उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेशच्या वडिलांचे छत्र हरवले असून मंगेशची आई दिव्यांग आहे. अशा परिस्थितीही मंगेशची शिक्षणातील गोडी निबंधातून दिसून आली. त्यामुळेच, मंगेशबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.

मंगशच कुटुंब अजूनही वडिलांच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेले नाही अशात मंगेशने लिहिलेला हा निबंध वाचून त्याच्या शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी आले होते. हा निबंध मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याची दखल घेत कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –