मतदान करा आणि मिळवा पेट्रोल-डिझेलच्या दरात सुट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान सुरू होणार आहे. या निवडणुकांचे मतदान ७ टप्प्यात पार पडणार आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाचे मत हे महत्त्वाचे असते. सामाजिक संस्था याबाबत जन जागृती करताना दिसतात.

मतदारांना जागृत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यासाठी एक घोषणा करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मतदारांसाठी मतदानाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलवर सुट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली. या योजनेचा फायदा घेण्यासाठी मतदारांना मतदान केल्यानंतरचे त्यांच्या बोटावर असलेले मतदानाचे चिन्ह दाखवणे आवश्यक आहे. मगच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, बंसल यांनी ही माहिती तर दिली आहेच. पण पेट्रोल पंपावरील कामगारही मतदारांना जागरूक करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे. ११ एप्रिल रोजी सुरू होणारे मतदान १९ मे रोजी समाप्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीत ९० कोटी भारतीयांनी आपला हक्क बजावाण्यासाठी ही मोहिम करण्यात येणार आहे.