जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला, प्रकृती नाजूक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा भागात दहशतवाद्यांनी आज सकाळी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला आहे. त्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

दहशतवाद्यांनी आज सकाळी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्या घरावर हल्ला केला. अब्दुल हमीद यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच भागात उपस्थित असलेल्या भाजपच्या आणखी एका महिला कार्यकर्त्याच्या घरात घुसले. मात्र, भाजपच्या महिला कार्यकर्त्या त्यावेळी घरी उपस्थित नव्हत्या, त्यानंतर दहशतवादी तेथून पळ काढला. अब्दुल हमीद हे बडगाम जिल्ह्यातील भाजपच्या ओबीसी युनिटचे जिल्हाध्यक्ष होते.

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी या भागात घेराव घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागात दहशतवाद्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि सरपंच सज्जाद खांडे यांची गोळ्या घालून हत्या केली होती.