‘त्या’मुळे पंतप्रधान मोदींना मत मागण्याचा अधिकार नाही : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मागण्याचा अधिकार नाही. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत शिवाजीनगर येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी नोटाबंदी, जीएसटी सारखी मोदींनी राबविलेली धोरणे अपयशी ठरली आहेत. सर्वसामान्यांसह लघु-उद्योजकांचे यामध्ये कंबरडे मोडले आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने देश अराजकतेकडे चालला आहे. असे शरद पवार यांनी म्हंटले. याचबरोबर, देशात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पाढा वाचला आहे. तसेच रिझर्व्ह कामकाजातही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी काय केले? असा प्रश्न विचारत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत सरकारने शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. राजीव गांधींनी देशात तंत्रज्ञान, दळणवळण तसेच आधुनिकता आणली. आणि हे विसरता येणार नाही असेही शरद पवार यांनी म्हंटले. याचबरोबर तुम्ही काय केले? असा सवालही त्यांनी केला. आणि याचे उत्तर द्या असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो. मात्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी प्रचाराने देशात जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे दोन धर्मांमधली दरी वाढत आहे. विकास, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी प्रचार करत आहेत त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही असेही शरद पवार यांनी म्हंटले.