पंकजा मुंडेंच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पुढे काय करायचं? 12 डिसेंबरला ठरवू असे म्हंटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. या सर्व घडामोडींमुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

पंकजा भाजप सोडणार याविषयी शरद पवारांना विचारण्यात आले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘पंकजा भाजपच्या चौकटीतून बाहेर जातील असं वाटत नाही. मात्र पक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा त्यांचा समज असावा. कदाचित राज्यातील नेतृत्वाविषयी त्यांची तक्रार असू शकते. ‘

पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत : चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात. कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असतो. असं का झालं याबद्दल तो आत्मचिंतन करत असतो. 12 तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Visit : policenama.com