‘कोरोना’ग्रस्त इराणला मदत देण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची तयारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराने चीनसह ६१ देशांमध्ये थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सर्व देश आरोग्यदृष्ट्या गंभीर परिस्थितीत आहेत. चीनमधील वुहान शहर हे या आजाराचे उगमस्थान आहे. सव्वाकोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात ‘कोरोना’मुळे हजारो लोक मृत्यू पावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चीनमधील अनेक प्रांतात या संसर्गाचा फैलाव झाला असून चीनच्या बाहेर जपान आणि इराणला ‘कोरोना’चा जबरदस्त तडाखा बसला आहे.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या आजारामुळे ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवाशांना इराणमध्ये जाण्याला बंदी केली आहे. त्याखेरीज इटली आणि दक्षिण कोरीया याही देशांना अमेरिकन पर्यटकांनी भेट देऊ नये अशाही सूचना अमेरिकन सरकारने केल्या आहेत. इराणमधील लोकांना अमेरिकेची मदत हवी असेल तर ती देण्याची माझी तयारी आहे असे ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे आज सांगितले. आमच्याकडील तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांची मदतही आम्ही देऊ असेही ट्रम्प म्हणाले.