‘कोरोना’ संकट काळात राजकारण करु नका, एकनाथ शिंदेंचा केंद्रीय मंत्र्याना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद आणि बंडामुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे खरे नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल अशी टीका केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. या टिकेला प्रत्युत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे राजकारण कोणी करु नये, अशा प्रकारचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करु, असा सल्ला त्यांनी आठवले यांना दिला.

कल्याणमध्ये एमसीएचआय क्रेडिया यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन झिरो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी रामदास आठवले यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना सल्ला दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व पार्थ पवार यांच्यातील वादाचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होईल का असे विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले, पवारसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. सध्या राजकारण महत्त्वाचं नाही. सध्या सरकारचा फोकस कोविडवर आहे. लोकांचे आरोग्य वाचवणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. याठिकाणच्या कोरोना स्थितीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या ठिकाणी सुरुवातीला कोरोना रुग्ण नव्हते. बाहेरुन आलेल्या लोकांमुळे त्या ठिकाणीही काही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आहेत. मात्र, कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. ही दिलासादायक बाब आहे. पोलीस, एसआरपीएफ, आरपीएफ, सीआरपीएफ यांच्या अधिकारी व जवानांच्या मी भेटी घेतल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.