‘त्या’ बलात्कार्‍याला वैद्यकीय उपचार देवु नका, वाचलाच तर भर चौकात फाशी द्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पनवेलमधील विलगीकरण कक्षात ४० वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता याचे पडसात उमटू लागले असून यावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘पनवेलमध्ये विलगीकरण कक्षात महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना समोर आली. त्यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नये ही पहिली शिक्षा, त्याहूनही तो वाचलाच तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी’ अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाहीच, अशा शब्दात त्यांनी आपला राग बोलून दाखवला आहे.

काय घडलं होत पनवेलमध्ये?

चार दिवसांपूर्वी पनवेल परिसरातील एका इसमाला कोन गावात इंडिया बुल्स येथील कोविड केअरमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा भाऊ जेवणाचा डबा घेऊन येत असे. त्याच्या रुमच्या बाजूलाच खारघर परिसरातील एक चाळीस वर्षीय महिलाही दाखल होती. डबा देणाऱ्या त्या इसमाने महिलेशी ओळख करुन घेतली होती. दरम्यान, त्यालाही लक्षणे जाणवल्याने तिथेच दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (१६ जुलै) संध्याकाळी तो त्या महिलेच्या रुममध्ये गेला. आपण डॉक्टर असल्याचे म्हणत काही समस्या आहे का, असे विचारले. महिलेने अंग दुखत असल्याचे सांगताच मसाज करावा लागेल, असे सांगून महिलेला विवस्त्र केले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीवर तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.