Coronavirus : ‘कोरोना’बद्दल खोटी माहिती WhatsApp, सोशल मीडियाव्दारे पसरवू नका, अन्यथा होईल ‘जेल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सोशल मीडियावर देखील कोरोनाबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील सुचवले जात आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारे अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना बाबात सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित असलेले रुग्ण आणि स्थितीबाबत दररोज सरकारी पातळीवरून माहिती दिली जात आहे. तरी देखील काहीजण सोशल मीडियामधून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, मृत्यू पडलेल्या रुग्णांची संख्या, कोरोना संशयित रुग्ण, विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या परिसराची महिती सोशल मीडियातून व्हायरल करत आहेत. ही माहिती व्हायरल करत असताना कोणतीही खातरजमा न करता व्हायरल करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीमुळे समाजात अकारण भीती निर्माण होत आहे. पुणे पोलिसांनी अशा प्रकारची माहिती किंवा बातमी खातरजमा न करता प्रसारित करु नये असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारे खातरजमा न करता माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्यास प्रचलित कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असून त्याबद्दल कारावास अथवा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात याची गंभीर नोंद घ्यावी असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमं व सोशल मीडियातील ग्रुप अ‍ॅडमिननी अशी कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी, असा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळणेकरीता आवश्यक उपाययोजना तसेच घ्यावयाची काळजी याबाबत माहिती प्रसारित करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी तसे पत्रकच प्रसिद्ध केलं आहे.