छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासनकर्ते : डाॅ. श्रीपाल सबनिस

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचा पुरस्कार करणारे, सर्वधर्मसहिष्णू, महिलांचा आदर करणारे होते. पराक्रमी, आदर्श शासनकर्ता, कुशल संघटक, नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस असे उच्च कोटीचे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेचे (वर्ष १३वे) ‘छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रचे भवितव्य’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी राजवर्धन पाटील, अंकिता पाटील, संभाजी व्यवहारे, विद्या महाजन, अमर गाडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, आज आपण २१ व्या शतकात आहोत, अजुनही खरा शिवाजी सांगितला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज शुर, पराक्रमी, अपराजित योद्धा होते. त्यांनी गनिमी कावा, रयेते विषयी असणारी धोरणे, युद्ध व मोहिमेमध्ये असणारा सहभाग, मानवतावाद, आरमार या विषयी सखोल माहिती दिली. तसेच आधुनिक इतिहासाची ओळख करुन देताना मुघलांपासून ते राजपूतापर्यंत सखोल विचार मांडत इ.स.१६३० ते १६८० पर्यंतचा कालखंड सांगीतला. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. इतिहास हा अभिनयाने नव्हे तर विवेकाने शिकविला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘महात्मा गांधी व सद्य परिस्थिती ‘या विषयावर द्वितीय पुष्प गुंफले. सत्य, प्रेम, अहिंसा व सदाचाराने गांधीजींनी देश समजून घेतला. गांधीजींनी जनतेचे प्रश्न समजून घेतले. महात्मा गांधी स्वातंत्र्य आंदोलनाच्या निमित्ताने देशाच्या कानोकोपऱ्यात फिरले. त्यामुळेच त्यांना जनतेने स्विकारलेची माहिती निरंजन टकले यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलसिद्धी उद्योग समुहाचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले होते. यावेळी शिवाजी मखरे, स्वप्नील सावंत, नानासाहेब चव्हाण, माजिद पठाण उपस्थित होते.

साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुर्ण वेळ थांबून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट होते. यावेळी बाळासाहेब मोरे, कल्पना भोर, ज्योती जगताप, लतिका जगताप, मनिषा मखरे, बाळासाहेब हरणावळ उपस्थित होते.

इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी प्रास्तविक केले. स्वागत सुनिल गलांडे, प्रा.भास्कर गटकूळ, शरद झोळ, योगेश गुंडेकर यांनी केले. सुत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर आभार अमोल खराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन जगताप, अमोल साठे, विशाल गलांडे, अनिकेत साठे, अय्याज तय्यब शेख, गणेश जगताप यांनी प्रयत्न केले.