लोखंड चोरी करणार्‍या ट्रक चालकास अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली, खांदवेनगर येथील एल एन्ड डब्लू कंपनीने अलिबाग येथून मागवलेल्या लोखंडातील 265 किलो लोखंड ट्रक चालकाने परस्पर विकल्याचे निष्पन्न झाले. लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण खात्याने याचा छडा लावला असून यातील लोखंड विकत घेणाऱ्याचा शोध चालू आहे.

लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोधू भैरव मंडल (वय 38 वर्षे, रा. खांदवेनगर, वाघोली, पुणे) यांनी दि 31 जानेवारी रोजी अलिबाग येथील जे एस डब्लू कंपनीतून 31.950 टन स्टील माल एका ट्रकमध्ये भरून पाठवला होता. तो दि. 03 फेब्रुवारी रोजी खांदवेनगर वाघोली येथील एल अँड डब्लू कंपनीचे साईटवर खाली केला. गाडीतील माल उतरवत असताना स्टील मालाला बांधलेली पट्टी ढिल्ली झाली असलेली दिसल्याने गाडीतील स्टील मालाचे काट्यावर वजन केले असता त्यामध्ये 31.950 टन मालापैकी 265 किलो स्टील माल कमी असल्याचे दिसले. अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ रवाना होवून घडला प्रकार समजून घेवून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून संशयावरून ट्रक चालक सुजीतकुमार प्रेमचंद जयस्वाल (वय 23 वर्षे, रा. दानोकुईया, संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) याचेकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याचेबाबत खात्री झालेने त्यास पोलिस स्टेशनमध्ये आणून सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्यातील 10,000/- रु किंमतीचे एकूण 265 किलो लोखंड ट्रक मधून लबाडीने चोरून काढून घेऊन सोमाटने फाटा, तळेगाव दाभाडे येथील एका वजन काटा मालकास विकले असल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्ह्यातील एकूण चोरून विकलेल्या मालाची एकूण 10,000/-रु रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच सोमाटने फाटा येथील वजन काटा मालकाचा लोणीकंद पोलीस शोध घेत आहेत.

ही कामगिरी हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर, शुभम मुत्याल यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बाळासाहेब सकाटे हे करीत आहेत.