चालकानेच लंपास केली ७८ लाखाची कॉपर कॉईल 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गोव्याहून कॉपर कॉईल भरून निघाल्यानंतर त्याची डिलिव्हरी संबंधित कंपनीला न देता ट्रकचालकाने त्यातील ७८ लाखांची कॉपर कॉईल लंपास करून ट्रकचालक पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर ट्रकही नाशिकजवळ सोडून देण्यात आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हुंडेकरी ट्रान्सपोर्टचे मालक संतोष रुकारी (वय ४६ वर्षे, रा. अरण्येश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक गणेश सुखदेव पवार (मु. पो. अंबाजोगाई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रुकारी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा हुंडेकरी ट्रान्सपोर्ट नावाचे कार्यालय आहे. दरम्यान त्यांनी गणेश पवार याला आपल्या कंपनीत ट्रकवर चालक म्हणून कामाला ठेवले होते. दरम्यान त्याला १ एप्रिल रोजी तो तळेगाव येथून माल घेऊन ४ एप्रिल रोजी गोव्यात गेला. तेथे त्याने तो माल उतरवला. त्यानंतर त्याला तीन दिवस कुठलीही ऑर्डर मिळाली नाही. दरम्यान त्याला ८ एप्रिल रोजी फिनोलेक्स कंपनीच्या कॉपर कॉईल ट्रकमध्ये भरल्या. त्यानंतर तो त्या घेऊन उर्से येथे जाण्यासाठी निघाला. दरम्यान तो ९ एप्रिल रोजी दुपारी तेथे पोहोचणे अपेक्षित होते.मात्र त्याला फोन केला तेव्हा तो शिरवळ येथे असल्याचे सांगितले. तसेच त्याने जेवण करून पोहोचतो असे व्यवस्थापकाला म्हणाला. परंतु कंपनी ५ वाजता बंद होत असल्याने त्याला मांगडेवाडी येथे थांबून उद्या सकाळी जाण्यास सांगितले.

तो मांगडेवाडी येथे थांबला त्यानंतर सकाळी तो उर्से येथे जाण्यासाठी निघाला. परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीतून रुकारे यांना फोन आला. की कॉपर फॉईल मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी गणेश पवारला फोन लावला. तेव्हा त्याचा फोन बंद आला. त्यानंतर गाडीचे जीपीएस लोकेशन तपासले तेव्हा ट्रक सिन्नर जवळ आढळून आला. त्यावेळी तेथे जाऊन पाहिले तेव्हा ट्रकमध्ये ७८ लाख रुपये किंमतीचे १६ टन कॉपर कॉईल गायब असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत.

You might also like