8 महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये 49 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केंद सरकारने दहशतवाद्याविरुद्ध कडक धोरण राबविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 79 दहशतवादी घटना घडल्या असुन, त्यामध्ये 49 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अशी माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत दिली. शिवाय 5 ऑगस्ट 2019 व 10 मार्च 2020 दरम्यान देशांतर्गत भागात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असल्याचे रेड्डी यांनी यावेळी सांगितले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
मागील तीन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या 1 हजार 500 पेक्षा अधिक घटना समोर आल्या आहेत.

तसेच, देशाच्या उर्वरीत भागात नोव्हेंबर 2018 मध्ये अमृतसरमधील ग्रेनेड हल्ला सोडला तर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 2017 ते 2019 दरम्यान 1550 दहशतवादी घटना समोर आल्या आणि या कालावधीत 251 जवान शहीद झाले. 118 नागरिकांचा मृत्यू झाला तर 627 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची त्यांनी रेड्डी यांनी माहिती दिली होती.