सांगली : खंडणी घेताना कथित सामाजिक कार्यकर्ता महिलेला बेड्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – आरटीओ कार्यालयातील कारभाराविरोधात विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण केल्यानंतर आत्मदहन आंदोलन न करण्यासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षकाला २ लाखांची खंडणी मागणाऱ्या कथित समाज सेविकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संजयनगर येथील हॉटेल दि ग्रेट मराठामध्ये पन्नास हजार रुपये स्विकारताना पोलिसांनी तिला अटक केली.

जयश्री अशोक पाटील (वय 28, रा. रमामातानगर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अनुराधा रघुनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री पाटील या छावा क्रांतीवीर सेना महिला आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहेत. त्यासोबतच त्या युवा मंच नावाची संघटनादेखील चालवतात. पाटील यांनी गतवर्षी झालेली महापालिका निवडणूक लढवली होती. प्रभाग क्रमांक पंधरामधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. एका राजकीय पक्षाने त्यांना पुरस्कृतही केले होते.

आरटीओ कार्यालयाबाहेर असलेल्या एजंटांवर कारवाई करावी यासाठी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर आरटीओ कार्यालयातीच कारभाराच्या चौकशी आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी आरटीओ कार्यालयासमोर आठ दिवसांपुर्वी बेमुदत उपोषणही केले होते. त्यावेळी आरटीओ विलास कांबळे यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र 1 मार्च ते दि. 22 मार्च या काळात वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील आरटीओ कार्यालय, सावळीतील कार्यालय तसेच ग्रेट मराठा हॉटेल येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनुराधा जाधव यांना त्या भेटल्या. त्यावेळी पाटील यांनी आत्मदहन आंदोलन न करण्यासाठी जाधव यांच्याकडे दोन लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीनंतर त्या दीड लाखांवर तयार झाल्या. त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये मागितले होते. परंतु सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनुराधा जाधव यांनी याची कल्पना संजयनगरचे पोलिस निरीक्षक संजय सुर्वे यांना दिली होती. सुर्वे यांनी हॉटेल परिसरात सापळा लावला. दुपारी पावणेतीनच्या सुमारास पाटील यांना जाधव यांच्याकडून पन्नास हजार रूपये घेताना हॉटेल दी ग्रेट मराठामध्ये रंगेहात पकडले. पाटील यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सुर्वे यांच्यासह जावेद मुजावर, महिला पोलिस एस. डी. मुल्ला, एस. आर. पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली