राज्यात आठवड्यात 1 हजार 657 पोलिसांना ‘कोरोना’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाने पछाडले आहे. त्यामुळे ऑनड्युटी करताना सर्वाधिक कर्मचारी बाधित होत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडयात पोलीस दलातील 1 हजार 657 जण बाधीत झाले आहेत. पोलीस दलात फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य पोलीस दलातील 17 हजार 091 अधिकारी, अंमलदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 13 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले. त्याशिवाय 3 हजार 64 पोलीस उपचार घेत आहेत. कोरोनामुळे 176 जणांचा मृत्यू झाला. 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान पोलीस दलातील बाधितांचा आकडा 1 हजार 657 ने वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे .त्यापैकी 19 अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला. रविवार एकाच दिवशी राज्यभरात 511 अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाले.

एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण होण्याची पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण बदलल्याचा दावा मुंबईचे नवे सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी केला. दरम्यान, गणेशोत्सवाआधी खरेदीसाठी आणि अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर पडणार्‍यांची संख्याही बर्‍यापैकी होती. पोलिसांची नियमित कामे वाढू लागल्याने पोलिसांमधील कोरोनाची बाधा वाढली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.