फलटण DySp च्या घराची झाडाझडती ; संपूर्ण पोलीस दलात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – दीड लाखांहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने फटलणचे डिवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले. ऐन निवडणूकीच्या धामधूमीत डीवायएसपी दर्जाचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीने ताब्यात घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रात्री उशीरा त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी एक पथक तैनात केले होते.

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटली यांनी एका प्रकरणात एका व्यक्तीकडे २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. परंतु संबंधित व्यक्तीने याची तक्रार अ‍ॅन्टी करप्शनकडे केली. त्यानंतर डीवायएसपी पाटील १ लाख ५० हजार रुपयांवर तडजोडीअंती तयार झाले. बुधवारी लाच स्विकारली जाणार होती. त्यानंतर पुणे आणि सातारा अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने फलटणमध्ये धाव घेतली. पथक फलटणमध्ये आल्याचे समजताच डॉ. पाटील नाट्यमयरित्या गायब झाले.

दरम्यान, सुमारे एक तासानंतर डॉ. अभिजीत पाटील एसीबीच्या पथकाला सापडले. रात्री त्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली. त्याबाबतचा तपशील अद्याप समोर आला नाही. तर तीन पथकांनी ही कारवाई केली. परंतु यात कमालीची गोपनीयता बागळण्यात आली होती. त्यासोबतच त्यांचा सहभाग लाचप्रकरणात असल्याचे समोर आल्यावर त्यांच्या घराची एसीबीचे पथक रात्री उशीरापर्यंत झडती घेत होते.

कोण आहेत डॉ. अभिजीत पाटील

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील मुळचे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगलूमधून वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज मधून शिक्षण पुर्ण केले. २०११ साली लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांनी १४ जूलै २०१८ रोजी फलटण उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज घेतला होता. त्यांची अप्पर पोलीस अधिक्षक पदी बढतीही होणार होती.