पूर्व हवेलीत पावसाचा ‘हाहाकार’, शेतीचे प्रचंड नुकसान

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील बहुतेक गावामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

परतीच्या पाऊसाने यावर्षी धुमाकुळ घातला असून गेली तीन ते चार दिवसापासून पूर्व हवेलीतील डोंगर भागातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आळंदी म्हातोबा येथील परिस्थिती वाईट आहे. गावच्या ओढ्याला पूर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे. गावकामगार तलाठी कनिचे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या भागात बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले असून तरकारी फुलांच्या शेतात पाणी शिरल्याने अर्थिक संकट ओढवलेले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या पंचवीस वर्षांत इतका मोठा पाऊस पडला नव्हता परंतु यावर्षी गेल्या चार दिवसात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. डोंगर उतारावर पाऊस पडल्याने ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. अनेक ठिकाणी ओढ्यात अतिक्रमण झाल्याने हे पाणी सरळ शेतात शिरले.

तसेच तरडे, वळती, शिंदवणे या गावातही मोठा पाऊस झाला आहे. हा पाऊस नुकसान दायक जरी वाटत असला तरीही यामुळे भविष्यातील पाणी टंचाई दूर होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. आजपर्यंत या भागाला मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती. शेतकरी वर्ग केवळ पावसावर अवलंबून असतो.