एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर हातावर बांधणार ‘घड्याळ’ ?

जळगाव : माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. याच पार्शवभूमीवर ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

संघटनात्मक पद, विधान परिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्यात खडसेंनी थेट फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुंबईत जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत अधिक बळकटी मिळाली होती. मुंबईवारीतच खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्षप्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. या चर्चेस शनिवारी पूर्णविराम मिळणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्ताला 17 ऑक्‍टोबरला नाथाभाऊंचा राष्ट्रवादीतील प्रवेश होणार असल्याचे राजकीय क्षेत्रातील सुत्रांनी सांगितलं.

राष्ट्रवादीतील संघटनात्मक पद व आमदारकी देण्यात येणार असल्याचे ठरले असल्याचे समजते. फडणवीस सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे पक्षावर नाराज आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेवरही त्यांना संधी दिली नाही.