‘त्या’ कामांसाठी सरकारची साथ हवी, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापुर्वीच खडसेंनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्याकडून आज राष्ट्रवादीत ( NCP) प्रवेश करण्यात येणार आहे.अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी २ वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्याकडून माझ्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले होते. एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश करण्याअगोदर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसल्याचं स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “कोणत्याही पदासाठी नाथाभाऊ प्रवेश करत नाही. मी आपल्या ताकदीने उभा आहे. मी मंजूर केलेली उत्तर महाराष्ट्रातील अनेक विकासकामं प्रलंबित आहेत. या विकासकामांना वेग मिळावा यासाठी सरकारची साथ हवी आहे म्हणून सरकारमध्ये असलं पाहिजे”.असे खडसेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे ( Rohini Khadse) देखील आहेत. तसेच रोहिणी खडसे यांनीसुद्धा आपण भाजपा( BJP) मधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून इथून पुढे राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केले आहे.एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत असे जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असेदेखील ते म्हणाले आहेत.