नेहरु आणि राजीव गांधीं नंतर नरेंद्र मोदींचाच ‘करिष्मा’ : रजनीकांत

नवी दिल्ली पोलिसनामा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी  मिळवलेल्या घवघवीत यशानंतर  त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील नरेंद मोदींचं कौतुक केलं आहे.  माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांच्यानंतर मोदी करिष्मा असलेले नेते असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जाणार असल्याचंही रजनीकांत यांनी म्हंटले आहे.

रजनीकांत  यांनी म्हंटले आहे की  ‘हा विजय नरेंद्र मोदींचा विजय आहे. ते करिष्मा असलेले नेते आहेत. भारतात जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांच्यानंतर मोदीच करिष्मा असलेले नेते आहेत. मी त्यांच्या शपथविधीसाठी जाणार आहे’, असं रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनातून रविवारी संध्याकाळी या याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात गुरुवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी समारंभ होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती कोविंद यांनीही ट्वीट करून शपथविधीबद्दल माहिती दिली होती.