उद्यानात येणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करणाऱ्या अभियंत्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रभात रस्ता परिसरात असलेल्या कॅनोल रस्त्यावरील उद्यानात अश्लील हावभाव करून पळून जाणाऱ्या एका अभियंता युवकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी योगेश नंदकुमार भरगुणे (वय २४, सध्या रा. कोथरूड, मूळ रा. जळगाव) याला अटक करण्यात आली. यासंदर्भात एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रस्त्यालगत असलेल्या कॅनल रस्त्यावर उद्यान आहे. या उद्यानात भरगुणे सकाळी साडेसातच्या सुमारास उभा होता. उद्यानात (जॉंगिंग पार्क) मोठ्या संख्येने नागरिक विशेषत: महिला दररोज सकाळी फिरायला येतात. तो महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करू लागला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या महिलांनी त्याच्याकडे आधी दुर्लक्ष केले. मात्र, एका महिलेने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेवड्यात तो तेथून दुचाकीवरून पसार झाला.

डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी तेथे जाऊन भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पडताळले. पसार झालेल्या दुचाकीस्वार भरगुणेच्या वाहन क्रमांकाची पाटी कॅमेऱ्यात टिपली गेली. भरगुणे मूळचा जळगावचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तेव्हा दुचाकी त्यांचा मुलगा वापरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Loading...
You might also like