Pimpri : नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणं अभियंत्याला भोवलं ! महापौरांनी दिला निलंबनाचा आदेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकालाा ऐकवणं चुकीचं आहे. कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला तात्काळ निलंबित करा असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना शुक्रवारी दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. यावेळी महापौर उषा ढोरे या अध्यक्षस्थानी होत्या.

संत तुकारामनगर प्रभागातील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी सभेच्या सुरुवातीलाच त्यांचा एक अनुभव सांगितला. प्रभागातील कामं होत नाहीत. अधिकारी कामाला टाळाटाळ करतात. कामासाठी कनिष्ठ अभियंत्याला कॉल केला असता त्यानं कॉल रेकॉर्ड केला. यानंतर त्यानं हा कॉल प्रभागातील दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवला. असं कृत्य करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कठोर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.

नगरसेविका आशा शेंडगे यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. दापोडी प्रभागात सुरू असणाऱ्या विकासकामांची कोणत्याही प्रकारची माहिती नगरसेवकांना दिली जात नाही. ठेकेदारांकडून दादागिरीची भाषा वापरली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना द्या अशी सूचना महापौरांना केली.

यानंतर महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “नगरसेवक म्हणजे त्या वार्डातील मंत्री असतो. त्याच्यावरच त्याच्या विभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणं चुकीचं आहे. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला आयुक्तांनी तात्काळ निलंबित करावं” असा आदेश त्यांनी यावेळी दिला.