EPFO ची नवीन सुविधा सुरु, आता कुठूनही सहजपणे होऊ शकतो PF दाव्यांचा ‘निपटारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणारी संघटना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ) ने म्हटले की, त्यांनी अनेक ठिकाणांहून मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे. यासोबतच दाव्यांचा तोडगा काढण्यासाठी भौगोलिक कार्यक्षेत्रातील सध्याची व्यवस्था बदलली आहे. याद्वारे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन दावे त्याच्या क्षेत्रीय कार्यालयाद्वारे निकाली काढता येतील.

सर्व ऑनलाईन दाव्यांचा तोडगा

या संदर्भात कामगार मंत्रालयाने म्हटले की, या सुविधेद्वारे ईपीएफओ कार्यालय देशातील त्याच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयांकडून केलेले दावे निकाली काढू शकेल. या नव्या उपक्रमांतर्गत भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, अर्धवट रक्कम आणि दावे व हस्तांतरण अशा सर्व प्रकारच्या ऑनलाइन दाव्यांचा निपटारा करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

कोरोना काळात दाव्यांची संख्या वाढली

कोविड-१९ च्या संकटाचा परिणाम ईपीएफओच्या १३५ क्षेत्रीय कार्यालयांमधील कामकाजावर झाला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे मुंबई, ठाणे, हरियाणा आणि चेन्नई विभागातील अनेक कार्यालये मर्यादित कर्मचार्‍यांसोबत काम करत असल्याचे दिसून आले आहे, तर दाव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

निपटारा करण्यास विलंब होणार नाही

निवेदनात म्हटले आहे की, यामुळे या कार्यालयांमध्ये प्रलंबित दाव्यांची संख्या बरीच वाढली आहे आणि त्यांचा निपटारा करण्यास उशीर होत आहे. अशात सर्व कार्यालयांमध्ये दावा निपटण्या संबंधित काम समान रीतीने वाटून दिल्यास विलंब कमी होईल.