लॉकडाऊन दरम्यान पुणेकरांसाठी अत्यावश्यक कामासाठी 500 रिक्षा उपलब्ध, ‘या’ क्रमांकावर करा बुकिंग, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. १३ जुलै म्हणजेच येत्या सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन लादण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. मात्र, आपत्तकालीन व्यवस्था म्ह्णून वैद्यकीय मदतीसाठी शहरातील रिक्षा सेवा सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ५०० रिक्षा उपलब्ध असणार आहेत.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात 25 मार्चपासून लागू झालेल्या पहिल्या लॉकडाउनमध्ये शहर वाहतूक पोलिस आणि ऑटो ग्लाईड यांच्यातर्फे वैद्यकीय मदतीसाठी आणि अत्यावश्यक कारणांसाठी रिक्षा सेवा सुरू होती. त्यासाठी नागरिकांना ९८५९१९८५९१ या क्रमांकावर बुकींग करावे लागत असे. या दरम्यान सुमारे ६३ हजार नागरिकांनी रिक्षासाठी फोन केले होते. त्यापैकी २२ हजार नागरिकांसाठी रिक्षा उपलब्ध झाली. यावेळी प्रवाशाला मीटरच्या दराच्या दुप्पट पैसे द्यावे लागत होते. म्हणजेच मीटरवर जर १०० रुपये झाले असतील तर, प्रवाशाला २०० रुपये आकारले जात असत.

मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. ज्यामुळे संसर्ग आणखी पसरला. यामुळे शहरात १४ ते २३ जुलै दरम्यान लॉकडाउन होणार आहे. यावेळीही रिक्षा सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली. त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत आणि अत्यावश्यक कारणासाठीच या रिक्षा उपलब्ध असतील. त्यासाठी सुमारे ५०० रिक्षांना पास देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउऩच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी जवळपास ३८७ रिक्षांना पास दिले होते. त्या दरम्यान रिक्षा चालकांना २२ हजार फेऱयांतून सुमारे ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच ऑटो ग्लाईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे यांनी सांगितले कि, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्यातून २०० रिक्षाचालकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. प्रवाशांनी रिक्षासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ९८५९१९८५९१ या क्रमांकावर कॉल करताच एक फॉर्म पाठविला जातो. तो त्यांनी भरून दिल्यावर रिक्षा उपलब्ध होईल की, नाही हे त्यांना सांगितले जाते. तसेच ही सुविधा २४ तास उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.