‘काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद त्यांच्यात आहे, परंतु …’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील हाथरस रेप केसच्या घटनेवरून संपूर्ण देश संतापला आहे. अशात हाथरसमधील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं. इतकंच नाही तर राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत अटक केली. यावरून आता काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. यावरून आता देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन केलं जातं आहे.

याबाबत बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, “खा. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीनं उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचं सिद्ध झालं आहे. हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ज्या पद्धतीनं रोखण्यात आलं, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचं, कायद्याचं राज्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.”

‘उत्तर प्रदेशात खरोखरच जंगलराज’

पुढं बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “उत्तर प्रदेशात जंगलराज आहे असं नेहमीच म्हटलं जातं. आज काँग्रेस नेत्यांना रोखून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला. सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवण्यात आले. माणुसकीला हरताळ फासला गेला. ते पाहता उत्तर प्रदेशात खरोखरच जंगलराज आहे हे स्वत: तिथल्या सरकानंच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.”

‘योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं राजीनामा द्यावा’

पीडित कुटुंबाचं सात्वन करण्यासाठी आणि तिथं नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हतं. तरीही त्यांना का अडवलं गेलं याचं उत्तर भाजपनं दिलं पाहिजे. या घटनेची नैतिक नैतिक जबाबदारी स्विकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं राजीनामा द्यावा” अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

‘काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात’

काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यात आहे. परंतु आमची ती संस्कृती नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली नाही. आम्ही गांधी विचारधारेवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गानं काम करणारी मंडळी आहोत असंही अशोक चव्हाण म्हणाले.