सौरभ गांगुलीचा गौप्यस्फोट, मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यात खटके उडाल्याचे प्रसंग चर्चेत आले होते. ग्रेग चॅपेल यांनी गांगुलीला आधी कर्णधार पदावरून दूर केले आणि त्यानंतर संघातून बाहेर केले. 2005 मध्ये कर्णधार पदावरून काढल्याने कारकिर्दीला मोठा धक्का बसल्याचे सौरभ गांगुलीनं मान्य केलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने परदेशात विजय मिळवण्यास सुरुवात केली होती. याशिवाय 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. मात्र, ग्रेग चॅपल मुख्य प्रशिक्षकपदी आले आणि सर्व काही बदललं. त्यांनी गांगुलीविरोधात बीसीसीआयला पाठवलेला मेल मीडियात लिक झाला होता. त्यामुळेच संघाबाहेर करण्यासाठी चॅपल यांना अनेकांनी मदत केल्याचे गांगुलीला वटते.

तो म्हणाला, क्रिकेट संघ एका कुटुंबाप्रमाणे असतो आणि कुटुंबातील वाद जगासमोर नेण्यापूर्वी ते सोडवता आले असते. मला चॅपल यांना एकट्याला दोषी ठरवायचे नाही. त्यांनी याची सुरुवात केली, यात वादच नाही. त्यांनी माझ्या विरोधात बीसीसीआयला मेल केला आणि तो लिक झाला. हे असंच घडू शकत नही ना ? मतमतांतर होती, कुटुंबात गैरसमज होते, परंतु चर्चा करून सोडवता आले असते. तुम्ही प्रशिक्षक होता आणि तुम्हाला माझ्या खेळात काही सुधारणा हवी होती, तर तसं मला सांगायला पाहिजे होते. मी खेळाडू म्हणून आलो तेव्हा मला सांगण्यात आलं, तर मग आधी का नाही सांगितलं ? असा प्रश्न गांगुलीने केला आहे. तो पुढे म्हणाला की, याचा अर्थ दुसरे निर्दोष आहेत असं नाही. त्यांना पाठींबा देणारी यंत्रणा होती. त्यामुळे मला संघाबाहेर करण्यात प्रत्येकाचा हात आहे. तरीही मी खचलो नाही आणि स्वत:वरील विश्वास गमावला नाही. असा गौप्यस्फोट बंगाली वृत्तपत्राशी बोलताना गांगुलीने केला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतल्यानंतर कर्णधार पदावरून हटवले आणि नंतर संघाबाहेरच केले. माझ्या कारकिर्दीला हा मोठा धक्का होता. माझ्यावर अन्याय झाला. तुम्हाला प्रत्येकवेळी न्याय मिळेल, असं नाही. परंतु त्यानंतर दिलेली वागणूक टाळता आली असती. झिम्बाब्वे दौऱ्यावर माझ्या नेतृत्वाखाली विजय मिळवून संघ परतला होता आणि मायदेशात परल्यानंतर मला का काढण्यात आले ? असे गांगुलीने म्हटले आहे. 2007 मध्ये देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. 2003 मध्ये आम्ही अंतिम फेरीत पराभूत झालो होतो. त्यामुळे मला स्वप्न पाहण्याचा हक्क होता. माझ्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली झाली होती. देशात आणि परदेशातही. तरीही मला अचानक वगळण्यात आलं ? वन डे संघात मी फिट बसत नाही, असे मला सांगितले आणि कसोटी संघातूनही बाहेर केले, असाही गांगुली म्हणाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like