देवेंद्र फडणवीसांनी हजारो कोटींचे घोटाळे केलेत, मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही, भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला, अशी टीका अनिल गोटेंनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी हजारो कोंटींचे घोटाळे केले आहेत, असा आरोप अनिल गोटेंनी केला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं, अशी बोचरी टीका अनिल गोटेंनी केली आहे. धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

“देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले”
मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही. फडणवीसांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत, असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही,” असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

“माझ्याकडे प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी”
प्रत्येक गावात त्यांनी काय घोटाळा केला आहे याची यादी माझ्याकडे आहे,” असं सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.

“लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला”
लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे असं सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं आहे. आपल्या पक्ष सोडण्याचं कारण सांगताना अनिल गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत.

त्यानंतर अनिल गोटे यांनी टिका केली की, “मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आलं. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आली असं ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का ? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असं मी म्हटलं असतं. पण यांना राजघराण्याची पडली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/