सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांना कोरोनाची बाधा झालेली. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढपुरात उपचार करण्यात आले होते. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना श्वास घेण्यातही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सुधाकरपंत परिचारक हे विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दीर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. काँग्रेसमध्ये स्व. वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात असे. २०१९ साली विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवलेली. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. सहकारी संस्था आणि सहकारी बँका त्यांनी चालवल्या. त्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील डॉक्टर असे संबोधले जात असे. त्यांच्या निधनामुळे जेष्ठ आणि अनुभवी लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.