‘कोरोना’च्या लसीसाठी 30 ‘माकडांवर’ केला जाणार ‘प्रयोग’

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढतच आहेत. संपूर्ण जगातील वैज्ञानिक या लसीवर काम करत आहेत, दरम्यान पुणे येथे कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यासाठी आता संशोधन हाती घेण्यात आले असून या प्रकल्पासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची गरज भासणार आहे.

दरम्यान ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतुनच घेतली जाणार असून या लसीचा सर्वात आधी प्रयोग या माकडांवर केला जाणार आहे. या प्रयोगासाठी वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ 30 माकडे उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच देशातील सध्याची परिस्थिती पाहता या प्रकल्पाला तातडीने परवानगी देण्यात यावी अशी शिफारस राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी शासनाकडे केली आहे.

दरम्यान ही मान्यता काही अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्या म्हणजे अनुभवी असणाऱ्या मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडण्यात यावे आणि त्यांना कुशलतेने कुठलीही इजा न होता हाताळावे. तसेच त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे आणि माकडांना व परिसरातील अन्य वन्यप्राण्यांना इजा न होता त्यांचे दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत होऊ देऊ नये आणि विशेष म्हणजे या प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर वापर न करणे. यासंर्भात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो अद्याप होऊ शकलेला नाही.