हैदराबाद महापालिका निवडणूक भाजपने का केली प्रतिष्ठेची ? जाणून घ्या

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   ग्रेटर हैदराबाद हा टीआरएस आणि एमआयएमचा बालेकिल्ला. तेथे जम बसवणे म्हणजे काही थोडकी गोष्ट नाही. त्यामुळे भाजपने ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीकडे संधी म्हणून पाहात निवडणुकीला एका मोठ्या निवडणुकीचं स्वरूप दिले. प्रचारात भाजपने(BJP) जी आक्रमकता दाखवली ती पाहून अनेकजण हैराण झाले होते. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपला असून, आता १ डिसेंबर म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपने (BJP) प्रचारात महापौर आपलाच असेल असा दावा केला असला तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना येथे पक्षाची किती ताकद आहे याची जाणीव आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी टीआरएसने ९९ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ४४ च्या तुलनेत फक्त ५ जागा मिळवल्या होत्या.

हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक दिग्ग्ज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. गृहमंत्री अमित शाह यांचीदेखील सभा घेण्यात आली होती. त्यामुळे भाजप ही निवडणूक प्रतिष्ठेची का करत आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव या महापालिका निवडणुकीचे प्रभारी आहेत. ते म्हणतात, ‘अनेक जण विचारतात की भाजप महापालिका निवडणुकीसाठी एवढी ताकद का लावत आहे. त्यांंना उत्तर देण्यापेक्षा माझा असा प्रतिप्रश्न आहे की, का नाही पूर्ण ताकदीनिशी उतरू?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हैदराबादमध्ये प्रचार केला. या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण हैदराबादमध्ये एक चांगला पर्याय म्हणून स्थापित होणं हे भाजपचं लक्ष आहे. रणनितीकारांच्या मते, टीआरएसच्या पतनाचं कारण मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे नेतेच असतील. कारण, त्यांच्यावर घराणेशाहीचा ठपका बसला आहे. यासोबतच पक्षावर भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अकार्यक्षमतेचाही आरोप होतो. त्याचाच फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. त्यामध्ये त्यांनी थेट घराणेशाहीवर प्रहार केला. आम्ही तेलंगणाला घराणेशाहीपासून लोकशाहीपर्यंत घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारापासून ते पारदर्शकतेपर्यंत आणि तुच्छतेच्या राजकारणापासून ते विकासापर्यंत घेऊन जायचं आहे, असे ते म्हणाले.

केसीआर यांच्या ऋणातून बाहेर पडण्याच्या तयारीत तेलंगणा?

गजवेलचं प्रतिनिधित्व केसीआर स्वतः करतात, तर सिरसिला हा त्यांचे चिरंजीव आणि आयटी मंत्री केटी रामाराव यांचा मतदारसंघ आहे, तर सिद्दीपेट केसीआर यांचे पुतणे हरीश राव यांचा बालेकिल्ला आहे. मात्र गजवेल, सिरसिला आणि सिद्दीपेटला लागून दुबक्कची सीमा आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुबक्का पोटनिवडणुकीत भाजपच्या आश्चर्यकारक विजयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तेलंगणाच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावल्याबद्दल केसीआर यांच्या ऋणातून आता बाहेर येण्याच्या मूडमध्ये तेलंगणाची जनता असल्याचं जाणकार सांगतात. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तेलंगणात ४ जागांवर विजय मिळवला, ज्यामुळे कार्यकर्त्यांचंही मनोबल वाढण्यास मदत झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि टीडीपीला हैदराबादमध्ये एक प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून जागा घेण्यातही अपयश आलं. त्यामुळे भाजप तेलंगणात एक सक्षम पर्याय तयार होण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे.