‘या’ कारणामुळे फेसबुकने कॉंग्रेसशी संबंधीत ६८७ पेजेस हटवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक काही दिवसावार येवून ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी सर्वात जास्त प्रचार हा सोशल मीडियावर केला जात आहे. अशातच सोशल मीडियाचे सर्वांत मोठे प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने मात्र कॉंग्रेसला धक्का दिला आहे. फेसबुकने कॉंग्रेसशी संबंधीत ६८७ पेजेस आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत. सोमवारी सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, अप्रामाणिक व्यवहार करण्याच्या कारणावरून हे पेजेस हटवण्यात आले आहेत.

देशाचा मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला हा ऐन निवडणूकीत धक्का मानला जात आहे. फेसबुकने आतापर्यंत अशी पहिल्यांदा कारवाई केली आहे. ज्यामध्ये कोणत्याही एका मोठ्या राजकीय पक्षावर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

फेसबुकने हे स्पष्ट केले आहे की, यामध्ये निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेत या पेजेसवरून चुकीचे संदेश व्हायरल होत होते. तसेच मुख्यतः ‘इनऑथेंटिक बिहेवियर’ म्हणजेच अप्रमाणिक व्यवहार या कारणावरून ही पेजेस हटवण्यात आली आहेत. भारतात जगभरातील सर्वात जास्त फेसबुक युजर आहेत. त्यामध्ये अनेक फेक अकाउंट्स बनवले गेले असून त्यावरून चुकीची माहीती व्हायरल केली जात असल्याचा दावा फेसबुकने केला आहे.

”आमच्या स्वयंचलित प्रणालीने आधीच हेरलेल्या आणि निलंबित केलेल्या सुमारे ६८७ फेसबूक अकाऊंट्स आणि पेजेसवर आम्ही कारवाई करताना ही पेजेस आणि अकाऊंट्स हटवली आहेत. या पेजेसवर प्रकाशित माहितीमुळे नव्हे तर अप्रामाणिक माहितीमुळे कारवाई करण्यात आली आहे. ही पेजेस आणि अकाऊंट्स वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या आयटी सेलशी निगडित होती,” असे फेसबुकने या कारवाईबाबत माहिती देताना म्हटले आहे.

डिलीट करण्यात आलेल्या या पेजचे अॅडमिन आणि अकाऊंटस चालवणारे हे स्थानिक बातम्या, आगामी निवडणुकीसंदर्भातील राजकीय मुद्दे, उमेदवारांची भूमिका या अकाउंट्सच्या माध्यमातून मांडत होते. तसेच भाजपासह काँग्रेसच्या इतर विरोधकांवर या पेजेसवरून टीका करण्यात येत होती. त्याचबरोबर ही पेजेस काँग्रेसच्या आयटी सेलशी जोडली गेली होती.