PM मोदींविरूध्दच्या #MunnaBhaiMBBS टॅगवर अखेर लष्करानचं केला खुलासा, पंतप्रधानांची भेट देखावा नसून ‘सत्य’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट देऊन गलवान येथे संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली. चीनशी सामना करणाऱ्या सैनिकांचे पंतप्रधान मोदी यांनी मनोबल वाढवले. त्यांनी यावेळी जखमी सैनिकांशी संवाद देखील साधला. त्यासाठी ते लष्कराच्या लेहमधल्या रुग्णालयात गेले होते. पण पंतप्रधानांची ही भेट आणि संवाद FAKE असल्याची शंका काही जणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींचे हे जखमी सैनिकांशी संवाद साधतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यासोबत काहींनी त्यावर शंका घेण्यास सुरुवात केली. #MunnaBhaiMBBS असा हॅशटॅग देखील ट्रेण्ड होऊ लागला. मोदी येणार म्हणून कॉन्फरन्स रुमचं हॉस्पिटल करून फोटोची संधी साधली, असं बोललं जाऊ लागलं. मोदींचे टीकाकार मोदींनी फोटो ऑपॉर्चिनिटी आणि प्रसिद्धीसाठी हा देखावा केल्याचा आरोप होऊ लागला. एकही डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णोपयोगी साहित्य नाही, असं कसं हॉस्पिटल असेल आणि अशा सोयी सुविधांमध्ये आपल्या शूर जवानांना उपचार दिले जातात का, अशी शंकाही उपस्थित केली जाऊ लागली.

अखेर लष्कराकडूनच यावर स्पष्टीकरण आलं आणि या सगळ्यावरच पडदा पडला. लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध करत लेहमधल्या जनरल हॉस्पिटलबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. लष्कराने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह दौऱ्यादरम्यान तिथल्या जनरल हॉस्पिटलला भेट दिली. त्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि तथ्यहीन आरोप केले गेले. आपल्या शूर जवानांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबद्दलही आरोप केले गेले, हे दुर्दैवी आहे. आपलं लष्कर जवानांची पूर्ण काळजी घेतं आणि सर्वोत्तम उपचार त्यांनी मिळतील याची जबाबदारी घेतं, अस लष्करानं स्पष्टीकरण दिलं आहे.

फोटोमध्ये दिसणारं हॉस्पिटल कॉन्फरन्स रुमसारखं दिसतं या आरोपालाही लष्कराने उत्तर दिलं आहे. हा लेह जनरल हॉस्पिटल संकुलनाचा भाग आहे. संकटकाळी आणि गरजेपुरती तात्पुरती सोय म्हणून इथे 100 जादा खाटांची सोय करण्यात आली आहे. उपचार संपवून विश्रांती घेणाऱ्या सैनिकांना इथे ठेवले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जनरल हॉस्पिटलचा काही भाग कोविड-19 आयसोलेश वॉर्ड म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे एरवी ऑडिओ व्हिज्युअल ट्रेनिंग रुम असलेली ही खोली नॉन कोविड रुग्णांसाठी सज्ज करण्यात आली आहे. गलवान खोऱ्यात जखमी झालेलेच हे सैनिक आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही यापूर्वी याच ठिकाणी सैनिकांची विचारपूस केली होती.