पिस्तूल आणि पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड बाळगणाऱ्या तथाकथित पत्रकाराला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्तूल आणि सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे बनावट आयकार्ड बाळगणाऱ्या तथाकथित पत्रकाराला लोणावळा ग्रामीण पोलासांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पिस्तूल आणि बनावट आयकार्ड जप्त केले आहे.

गणेश गोपीनाथ वायकर (रा.कारला ता. मावळ जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक लुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश वायकरक हा एका नामांकित वृत्तपत्रात कामाला होता. त्याला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी त्याच्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. माझे पती पिस्तूलाचा धाक दाखवून आम्हाला घरातून बाहेर काढत आहेत. त्यासोबतच ते धमकी देत आहेत.

त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लागलीच कारला या गावी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घरी जाऊन पाहिले तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल होते. त्यासोबतच पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे सहायक पोलीस निरीक्षकाचे बनावट आयकार्ड मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. त्यानंतर त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याने पिस्तूल कोठून आणले आणि आय कार्डचा काही गैरवापर केला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.