पालघर मॉब लिंचिंग : मृत्यू झालेल्या ड्रायव्हरच्या कुटूंबियांनी केली हत्यारांच्या फाशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊन दरम्यान १६ एप्रिल रोजी पालघरमध्ये दोन साधू आणि चालकाची निर्घृण हत्या केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून मोठ्या संख्येने लोकांना ताब्यातही घेतले आहे.

निलेश तेलगडे असे वाहन चालकाचे नाव असून तो दोन साधूंना सूरतला अंत्यदर्शनासाठी घेऊन जात होता. अगोदर दुसऱ्याच एक ड्रायव्हर आणि कार जाणार होते, पण घरात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांचे जाणे पुढे ढकलण्यात आले. यानंतर नीलेशला ही जबाबदारी देण्यात आली. मुंबईच्या कांदिवली येथील पिंपळेश्वर मंदिराजवळ निलेश राहायचा. त्याच्या पश्चात पत्नी पूजा, आई निर्मला आणि दोन लहान मुली शालिनी (७ वर्षे) आणि सानिका (५ वर्षे) आहेत.

निलेशच्या घरचे रडून-रडून बेहाल झाले आहेत. त्याची पत्नी पूजा म्हणाली, “माझे पती दोन साधूंना रामगिरी महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी सुरतला घेऊन जात होते. लहानपणापासूनच त्यांनी रामगिरी महाराजांना गावात पाहिल्यामुळे त्यांचा खूप आदर होता. रामगिरी महाराजांच्या मृत्यूबाबत जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांना वाटले की दोन साधू घेऊन जाण्याने ते स्वतः देखील महाराजांचे शेवटचे दर्शन घेतील.

पूजा म्हणाली, “आम्ही त्यांना शेवटच्या वेळी १६ एप्रिल रोजी दुपारी घराबाहेर पडताना पाहिले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरी आला. आम्ही त्यांचा चेहरा बघू शकलो नाही. कुटूंबियांनी त्यांचा चेहरा अखेर गुरुवारी पाहिला होता. मला वाटते कि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. त्यांनी दोन साधू व माझ्या पतीला मोठ्या निर्दयतेने मारले. त्यांना फाशी द्या. या गुन्ह्यासाठी फाशी शिवाय कोणतीही शिक्षा दिली जाऊ शकत नाही.”

निलेश हा घरात एकटा कमाई करणारा होता. निलेशची आई निर्मला यांच्यासाठी तर त्यांचा मुलगा गेल्यामुळे त्यांचे जग उध्वस्त झाले. त्यांनी सांगितले की, “१६ एप्रिल रोजी जेव्हा ते दोन साधूंसोबत सुरतला जात होते, तेव्हा वाटेवर पालघरजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आम्हाला दुसऱ्या दिवशी १७ एप्रिलला जेव्हा पोलिस आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला माहिती मिळाली. तो माझा मोठा मुलगा होता आणि कुटुंबाचा एक मजबूत आधारस्तंभ होता. तो आमच्या कुटुंबातील कमावणारा सदस्य होता.”

त्या म्हणाल्या की, हे घडल्यापासून संपूर्ण कुटुंब धास्तावले आहे. आम्हाला समजत नाही की आता आमचे काय होईल? घर कसे चालणार आणि आम्ही कोणाच्या आधारावर जगणार? त्याच्याशिवाय आम्ही काय करू? बाकी काही नको फक्त न्याय मिळावा यासाठी मी सरकारला आवाहन करेल.