Coronavirus : ‘कोरोना’मुळं शेतकरी झाला ‘परेशान’, जिवंत पुरल्या 6000 कोंबड्या (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे बर्‍याच लोकांनी चिकन आणि मटण खाणे बंद केले आहे. त्यामुळे चिकन आता बर्‍याच भाज्यांपेक्षा स्वस्त विकले जात आहे. एकेकाळी २०० रुपये किलो विकले जाणारे चिकन आता ४० ते ५० रुपयांना विकले जात आहे. कर्नाटकच्या बेळगावातील एका शेतकऱ्याने चिकनला कमी भाव मिळाल्याने त्याने जवळपास ६ हजार कोंबड्या जिवंत गाडल्या.

ही घटना बेळगावच्या गोकक तालुक्यातील आहे. येथील मकंदरा चिकन फार्ममधून ६ हजार कोंबड्यांना शेतकऱ्याने एका ट्रॉलीमध्ये भरून आणले आणि त्यांना एका खड्ड्यात टाकून जिवंत पुरले.

शेतकरी नजीर मकंदरा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे लोकांनी चिकन खाणे बंद केले आहे. त्या कारणामुळे चिकनला ८ ते १० रुपयाचा भाव मिळत आहे. या विषाणूमुळे आम्हाला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोंबड्यांना जमिनीत गाडले.

सोशल मीडियावर अफवा आहे की कोंबडी खाण्यामुळे कोरोना व्हायरस होतो. या अफवामुळे लोकांनी चिकन खाणे बंद केले आहे. त्याचा परिणाम कोंबड्यांवर झाला असून बाजारात कोंबडीच्या मांसाची मागणी कमी झाली आहे.

त्याच वेळी या अफवाचा सामना करण्यासाठी कर्नाटक सरकारने अलीकडेच एका कार्यक्रमात लोकांना कोंबडी खाण्याचे आवाहन केले होते आणि हे स्पष्ट केले होते की कोंबडी खाण्यामुळे कोरोना होत नाही. असे असूनही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि त्यामुळे लोक चिकन खाण्यास नकार देत आहेत.