ज्योतिरादित्य शिंदेंच्या सभेतच शेतकर्‍याचा मृत्यू, श्रद्धांजली वाहून केलं प्रचाराचं भाषण

भोपाळ : वृत्त संस्था – निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी आलेल्या एका शेतकर्‍याचा भरसभेत खुर्चीत बसलेला असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील खंडवा येथील मुंदीमध्ये घडली आहे. यानंतर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे प्रचारसभेत आल्यानंतर त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मौन ठेवले आणि मृत शेतकर्‍याला श्रद्धांजली अर्पण करून शिंदे यांनी भाषण केले. मात्र, ज्यावेळी शेतकर्‍याचा मृत्यू झाला तेव्हा लोकांनी संताप व्यक्त केल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता.

या 70 वर्षीय शेतकर्‍याचे नाव जीवन सिंह असून ते उतावद गाव येथून सभेला आले होते. मागच्या बाजूला खुर्चीवर बसले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच रॅलीमध्ये लोकांनी गोंधळ घातला. जीवन सिंग यांना तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यानंतर सभेत आलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंनी भाषण सुरू करण्यापूर्वी मृत शेतकर्‍याला श्रद्धांजली वाहिली आणि भाषण केले. सभेला खंडवाचे खासदार नंदकुमार सिंह चौहान देखील उपस्थित होते. भाजप उमेदवार नारायण पटेल यांच्यासाठी ही सभा मूंद येथे आयोजित करण्यात आली होती. मध्य प्रदेशात 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत.