मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

अकोट (अकोला) : पोलीसनामा ऑनलाईन – शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. ही घटना अकोट तालुक्यातील उमरा येथे आज (शनिवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (वय-५२) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नावे आहे. त्यांची पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे दोन वर्षांची नात पुजा सकोसे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सुकोसे यांची उमरा शिवारात शेती आहे. आज सकाळी सुकोसे कुटुंब शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. अकराच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबावर हल्ला चढविला.

हा हल्ला एवढा जबर होता की, सर्व जण गंभीर जखमी झाले. मधमाशांचा दंश असह्य झालेले सुकोसे कुटंबियांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. यावेळी सुनिल वर्तने हे सुकोसे कुटुंबियांच्या मदतीला धावले. जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोसे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पुजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.