शेतकरी झालाय हवालदिल मात्र ‘महावितरण’ची सक्तीची वीजबिल वसुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  “ना पिण्यास पाणी… ना शेतमालाला बाजारभाव” मात्र महावितरण कडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात” असे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत असून वीज बिल वसुली करण्यासाठी महावितरण कडून जबरदस्ती केली जात असून वीज बिल न भरणाऱ्या शेतकर्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे.या प्रकारामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात भीमा नदीला बारमाही पाणी असते तर घोडनदी कोरडी ठक पडली आहे.अनेक शेतकर्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोना च्या अस्थिर परिस्थिती मुळे शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा,पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे. सध्या मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था,बँकांचे हप्ते यांचे व्यवहार भरना शेतकऱ्यांना मार्च अखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.मात्र अनेक शेतकरयांना आलेली भरमसाठ वीज बिले कशी भरायची हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीज बिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा कडक इशारा महावितरण कडून दिला जात आहे.तसेच काही शेतकऱ्यांची वीज बिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.

सध्या उन्हाळा कडक सुरू असून शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते.अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत.गेल्यावर्षी लॉक डाऊन मुळे प्रचंड आर्थिक तोट्यास शेतकऱ्यांला सामोरे जावे लागले.तर यावर्षी चांगला बाजार मिळेल या आशेने अनेक शेतकर्यांनी पिके घेतली परंतु ऐनवेळी वीज कनेक्शन बंद केल्याने ही पिके आता कशी जगवायची,कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशू पालकांनी केला आहे. त्यामुळे महावितरण कडून शेतकर्यांचे प्रश्न समजून घेऊन तातडीने वीज बिलासाठी होणारी पिळवणूक तातडीने थांबवावी अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केली आहे.