कारवाई केली म्हणून महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला केलं ‘दूर’, मुंबई पोलिसांचा असाही ‘आदेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एरवी कारवाई केली नाही, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाते. प्रसंगी त्यांना निलंबित केले जाते. वादाचा विषय होऊ शकेल, असे पडदे हटविताना जादा पोलीस बळाचा वापर केला म्हणून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांची चौकशी सुरु केली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यापासून दूर ठेवण्यात येणार आहे. नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी असा निर्णय घेतला आहे.

नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरलँड येथे एनआरसी, सीएए आणि एनपीआर या कायद्यांवरुन केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी हिरव्या पडद्याचे छत लावण्यात आले होते. पोलिसांनी या छताला आक्षेप घेऊन हे पडदे हटविले. तेव्हा हे पडदे काढण्यासाठी पोलिसांनी आवश्यकतेपेक्षा जास्त बळाचा वापर केला व महिलांच्या बाबतीत असंवेदनशीलता दाखविली, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर गंभीरतेने दखल घेण्यात आली असून तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार आहे आणि जोपर्यंत चौकशी चालू आहे. तोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना मुंबई बाग, मोरलँड रोड, नागपाडा येथून दूर ठेवण्यात येणार आहे, असे पत्रक मुंबई पोलिसांनी काढले आहे.

यापूर्वी तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून कारवाई केली जात होती. आता कारवाई केली तर जादा पोलीस फोर्स वापरला म्हणून कारवाई केली जात असल्याने नेमके कसे काम करावे, असा प्रश्न पोलीस अधिकार्‍यांकडून विचारला जाऊ लागला आहे.