आता ‘मास्क’च्या दंडाची रक्कम महापालिका आणि पोलिस प्रशानात होणार ‘फिफ्टी-फिफ्टी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ६५ हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे तर साडेतीन कोटीपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आला आहे. दंडाची रक्कम पोलिसांनाही मिळावी असा प्रस्ताव पालिकेला देण्यात आला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर दंडाची रक्कम निम्मी पोलीस आणि पालिकेला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मंगळवारी या प्रस्तावाला स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता दंड वसुलीतील निम्मी रक्कम पोलीस प्रशासनाच्या आणि निम्मी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. शहरात कोरोनाचा प्रसार जास्त झाल्यानंतर नागरिकांनी मास्क वापरावा तसेच सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी पालिकेकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली. हि कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पोलिसांना या कारवाईचे आदेश आणि अधिकार देण्यात आले. पण पोलिसांकडून करण्यात येणारी कारवाई महानगरपालिकेच्या छापील पावती पुस्तकावर करण्यात येते. पोलीस दंड वसूल करत असले तरीसुद्धा नागरिकांना पोलिसांकडून महानगरपालिकेच्या दंडाची पावती देण्यात येते. ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय पुढाऱ्यांवरही करण्यात येत आहे.

नांदेडचे काँग्रेसचे आमदार तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी सुद्धा यांनासुद्धा या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. अनेक शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा दंडाची रक्कम भरावी लागली. अनेकदा ही दंड वसुली करताना नागरिकांचा आणि पोलिसांचा बऱ्याचदा वाद सुद्धा होत आहे. परंतु मास्कचा दंड भरावाच लागतो. पण शहरात ठिकठिकाणी पालिकेपेक्षा पोलीस प्रशासनच अधिक कारवाई करताना निदर्शनात येत आहे. आता इथून पुढे दंडवसुली मधून मिळणारी रक्कम पालिका आणि पोलीस प्रशासनामध्ये ‘फिफ्टी-फिफ्टी’ विभागण्यात येणार आहे. त्या निर्णयाला स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हि माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.