नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या कार्यकर्त्यांत राडा

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रचार संपताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून त्या तपासण्याची मागणी करत नासधूस करण्यात आली. नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप शर्मा यांच्या कारमध्ये मतदरांना आमिष दाखविण्यासाठी पैसे असल्याचा संशय आल्याने पोलिसांना कारची तपासणी करण्यास कार्यकर्ते सांगत असताना प्रदिप शर्मा यांच्या अंगरक्षकांनी बविआ कार्यकर्त्यावर हात उगारला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या दोन्ही वाहनांच्या काचा फोडल्या. संतप्त कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. पहाटे तीनपर्यंत मतदारसंघात तणावपूर्ण शांतता होती. याबाबत बविआ आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रदीप शर्मा यांनी बाहेरचे गुंड आणून नालासोपारा मतदारसंघात पैसे वाटले. या गुंडांकडून स्थानिक लोकांना मारहाण केली. जे गुंड शर्मासोबत फिरत आहेत, ते खून, ड्रग्ज यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेली, तर काही गुन्हा दाखल झालेले आरोपी आहेत. मतदानाच्या दिवशी जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्थेची पायमल्ली करणे, मतदारांमध्ये भीती निर्माण करणे, हे सर्व प्रकार घडविण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

visit : Policenama.com