राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. आता राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.3) पुण्यात कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षातील मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 230 कृषी विद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन विद्यालयातील 10 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक शुक्रवारी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. विश्वनाथा, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक हरिहर कौसडीकर उपस्थित होते.

विश्वजीत माने म्हणाले, राज्यातील कृषी पदविकाधारक विद्याथ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. मात्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती, तसेच लॉकडाऊन वाढल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. राज्यातील दोन वर्षे पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच तीन वर्षे तंत्रनिकेतन विभागाचे विद्यार्थी यांची शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार आहे. आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मुल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. याचा फायदा राज्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे माने यांनी सांगितले.