Coronavirus : पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त, रविवारी 125 नवे रुग्ण तर 194 जण झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे जिल्ह्यात रविवारी एका दिवसात १२५ नवीन रुग्ण आढळून आले. त्याचवेळी दिवसभरात १९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या ५० दिवसात हा पहिलाच दिवस आहे की, ज्या दिवशी नवीन पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहेत.
शासनाने घेतलेल्या नव्या धोरणामुळे हे घडून आले आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २ हजार ८५७ वर पोहचली आहे. जिल्ह्यात रविवारी ५ रुग्णांचा मृत्यु झाला. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात १५६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होऊन जाणार्‍यांची संख्याही वाढत आहे. रविवारी दिवसभरात १९४ रुग्ण घरी गेले आहेत. पुणे शहरासह संपूर्ण कन्टमेंट झोनमध्ये प्रशासनाने अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचवेळी कन्टेंमेंट झोन बाहेरील भागातील लोकांचे जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

जिल्ह्यात दिवसभरात ९९५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२५ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सध्या शहरात ९२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यातील १७ जणांना व्हॅटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुणे शहरात २ हजार ४७५ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १७० आणि कॅन्टोंमेंट व ग्रामीण भागात मिळून २१२ रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.