पंकजा मुंडेच्या व्यासपीठावर फडणवीसांच्या हातात ‘बूट’, चर्चेला उधाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर काल एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये करण्यात आले. यावेळी पाठिंबा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते. परंतु व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बुट पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हातातील बुटाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी असे करण्यामागचे कारण काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडू लागला असताना राष्ट्रवादीने याच मुद्यावरून फडणवीस यांना उपरोधक टोला मारला आहे.

सोमवारी पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रासप नते महादेव जानकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी आले होते. फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मराठवाड्याचे नुकसान करू नका असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. मात्र, चर्चा आहे ती त्यांच्या हातात असलेल्या बूटांची. हातात बूट घेऊन उभे असलेल्या फडणवीस यांचा फोटो व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर खोचक टीका होत आहे. मागील पाच वर्षे राज्याच्या विकासाबद्दल घसा ताणून ते सांगत होते. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ढोल बडवून सांगत होते. तेच फडणवीस आता आंदोलनात सहभागी होतात. मात्र, आंदोलनस्थळी असलेल्या आपल्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही. आपण चोरांच्या टोळीत बसलोय की काय असे त्यांना वाटत असावे त्यामुळेच त्यांनी बूट हातात घेऊन भाषण केले, असे चाकणकर यांनी म्हटल आहे.