माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. रणजितसिंह यांचे वडिल आणि फलटणचे सुपुत्र माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे निधन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – फलटणचे सुपुत्र व माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय ७२) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी ४ वाजता निघणार आहे. फलटणमधील आईसाहेबनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार होणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे ते वडिल होत. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, त्यांच्या स्रुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा जन्म १५  ऑगस्ट १९४८ रोजी सातारा जिल्ह्यातील शेंडेवाडी येथे झाला होता. राजघराण्यात जन्मलेले हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून काम करीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना बळकट करण्याचे काम केले. १९९६ मधील सातारा लोकसभा निवडणुकीत हिंदुराव नाईक निंबाळक यांनी काँग्रेसचे प्रतापराव भोसले यांचा पराभव केला होता. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या रुपाने पश्चिम महाराष्ट्रातून पहिला खासदार संसदेत गेला होता.